मोठी बातमी : भरदिवसा ९ लाखांची रोकड लांबविणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद !

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील आयडीबीआय बँकेतून पैसे काढून दुचाकीने घरी आल्यानंतर दुचाकी घरासमोर पार्क करत असतांना दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुचाकीला लावलेली कापडी पिशवीला जोरदार झटका देऊन ९ लाखांची रोकड घेऊन पसार झाल्याची खळबळजनक प्रकार सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता भरदिवसा घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत रामदास शिंगाणे वय-५८, रा. भोईवाडा, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते सेवानिवृत्त आहेत. दरम्यान सोमवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी बँकेतून ९ लाख रुपये काढून कापडी पिशवीत ठेवत दुचाकीने घरी आले होते. त्यावेळी भोईवाडा येथील घरासमोर ते दुचाकी लावत असताना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकी देऊन त्यांच्या दुचाकीला लावलेल्या पिशवीला झटका देऊन पसार झाल्याची घटना घडली. या संदर्भात दुपारी ३.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देान दुचाकींवरून जातांना चार संशयित चोरटे कैद झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहे.

Protected Content