अडावद (चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बेकायदेशीर गावठी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात अडावद पोलिसांनी मोठी कारवाई करत वडगाव खुर्द येथे सुरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकली. या कारवाईत तब्बल ६०० लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन जप्त करण्यात आले असून मुख्य आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अडावद पोलिसांच्या गुप्तहेर पथकाला वडगाव खुर्द गावठाण परिसरातील नाल्याजवळ हातभट्टीद्वारे गावठी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचत १९ जुलै रोजी दुपारी सुमारे ३ वाजता घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी उपस्थित असलेला शत्रुघ्न आण्णा भिल (वय ३०, रा. वडगाव खुर्द, ता. चोपडा) हा आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याचा पाठलाग करून त्याला रंगेहात ताब्यात घेतले.

त्यानंतर घटनास्थळाची झडती घेतली असता पोलिसांना प्रत्येकी १० हजार रुपये किमतीच्या तीन मोठ्या टाक्या आढळून आल्या. या टाक्यांमध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी भिजवलेले एकूण ६०० लिटर कच्चे रसायन साठवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे हे संपूर्ण रसायन जप्त केले असून त्याचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मधुकर पवार करीत आहेत.
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार राबविण्यात आली. अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय धनगर, विनोद धनगर आणि मधुकर पवार यांच्या पथकाने ही यशस्वी धाड पार पाडली. या कारवाईनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, ग्रामीण भागातील आरोग्य आणि सामाजिक शांततेला बाधा आणणाऱ्या अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. परिसरात अशा प्रकारची कोणतीही बेकायदेशीर हालचाल आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



