Home क्राईम हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

हरिपुरा धरणात बुडून १७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

0
55

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील हरिपुरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली असून एकुलत्या एक मुलाच्या निधनामुळे फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील महाजन गल्लीतील रहिवासी तथा होमगार्ड संजय सिताराम फेगडे यांचा १७ वर्षीय मुलगा जयेश संजय फेगडे हा आपल्या चुलत भाऊ आणि वहिनीसोबत हरिपुरा धरण परिसरातील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास धरण परिसरात असताना तो पाण्यात उतरला असता त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाल्याची घटना घडली. घटनेनंतर परिसरात एकच धावपळ उडाली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आदिवासी पावरा समाजातील एका धाडसी तरुणाने तत्परता दाखवत धरणाच्या पाण्यात उतरून जयेशचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

जयेश फेगडे हा संजय फेगडे यांचा एकुलता एक मुलगा असल्याने या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली असून फेगडे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना सांत्वन केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत आवश्यक तपास सुरू केला आहे.


Protected Content

Play sound