Home क्राईम तहसीलदारांच्या बनावट सह्यांसह ४३ बोगस दाखल्यांचा प्रकार उघड; चौकशी होवून गुन्हे दाखल...

तहसीलदारांच्या बनावट सह्यांसह ४३ बोगस दाखल्यांचा प्रकार उघड; चौकशी होवून गुन्हे दाखल होणार !

0
201

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात तब्बल ४३ प्रकरणांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे बनावट जन्मदाखले तयार करून नागरिकत्व मिळवण्याच्या मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण गैरव्यवहाराच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, महापालिका आणि तहसीलदार कार्यालय स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

फेब्रुवारी महिन्यात अवघ्या दहा ते बारा दिवसांत ५० प्रकरणे दाखल झाली होती, त्यातील ४९ जन्मदाखले आणि १ मृत्यू दाखला होता. मात्र, कर्मचारी तपासणी करत असताना तहसीलदारांच्या सहीबाबत शंका निर्माण झाली. चौकशीदरम्यान, फक्त 7 दाखल्यांवर खऱ्या सह्या असल्याचे स्पष्ट झाले, तर उर्वरित 43 दाखल्यांवर बनावट सह्या आढळल्या. त्यामुळे हा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राज्यात याआधीही रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी बनावट जन्मदाखल्यांच्या आधारे नागरिकत्व मिळवल्याचे प्रकार समोर आले आहेत. मालेगावमध्ये अशाच प्रकारच्या बोगस दाखल्यांमुळे पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळे जळगावातील या प्रकरणातही बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर, जळगाव महापालिकेने संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, तहसीलदार कार्यालयाकडून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound