यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळा येथील बंद घरातून २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुरेश अडकमोल (वय-२५) रा. मोहराळा ता. यावल हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गवंडीकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या त्यांचे कपाशीच्या काड्यांच्या कुडाचे घर आहे. त्यामुळे नवीन घर बांधण्यासाठी मोहराळा येथील बँकेतून त्यांनी २५ हजार रुपयांचे कर्ज काढले होते. ते पैसे घरातील कपाटात ठेवले होते. १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ते कुटुंबियासह सायंकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून मिरवणूकीत गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या बाजूतून आत प्रवेश करत कपाटातील २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेले. रात्री १०.३० वाजता घरी आल्यावर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे समजले. त्यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार १५ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.