शेतकरी पुत्राचा करारी बाणा ! : मर्सडिझवर चढविला बळीराजाचा साज

अमळनेर गजानन पाटील | सध्या शेतीची बिकट अवस्था असून शेतकरी म्हणवून घेण्यातही अनेकांना न्यूनगंड वाटतो. मात्र कळमसरे यांनी शेतकरी पुत्राने आपल्या विवाहात दाखविलेला करारी बाणा आणि स्वाभीमान हा परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.

सद्यस्थितीत नोकरी असेल छोकरी नाहीतर नापसंती असे चित्र दिसून येते. शेतकरी नवरा नको अशी बहुतांश मुलींची भूमिका देखील असते. मात्र याला आजही अपवाद पाहायला मिळतो. उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा मात्र आजही ताठ मानेने जीवन जगत आदर्श ठेवीत शेती वा व्यवसाय वरिष्ठ तर नोकरी कनिष्ठ असे दाखवून देतो. अशाच प्रकारे अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील आदर्श शेतकरी योगेंद्रसिंग राजपूत यांच्या मुलाच्या विवाहात नवरदेवाचा स्वाभीमानी बाणा कौतुकाचा विषय बनला आहे.

भूपेंद्रसिंग राजपूत याच्या विवाहाप्रसंगी चक्क नवरदेवाच्या गाडीलाच शेतकरी राजाच्या रथाचे प्रतीक असलेले बैलगाडेच चिन्ह व शेतकरी बैनर लावीत भावी अर्धांगिनिशी विवाह बंधनात होण्यासाठी रवाना झाले. आज त्यांचा विवाह हा अतिशय उत्साहात पार पडला. येथील योगेंद्रसिंग राजपूत यांचा एकुलता एक मुलगा भुपेंद्रसिंग राजपूत हा वडिलांच्या शेती व्यवसाय निष्ठेने पुढे नेत आहे. आज शिरपुर येथील जगदीशसिंग देशमुख यांच्या सुकन्या चि. सौ.का.हेमांगीदेवी हिच्याशी त्यांचा विवाह पार पडला. खरं तर, सदयस्थितित विवाह होताना नवरदेवाच्या गाडीला वेगवेगळे फिल्मी बैनर पाहायला मिळतात. यात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे वा बंध रेशमाचे,तूच माझी जीवनसाथी असे नानाविध प्रकारचे डिजिटल फलक सजवलेल्या नवरदेवाच्या गाडीवर सहज नजरेस पडत असतात. मात्र, कळमसरे येथील राजपूत हे शेतकरी कुटुंब याला अपवाद ठरले आहे.आजच्या तरुणाईला यातून वेगळा संदेश मिळावा या उद्देशाने नवरदेवासाठी सजविलेल्या महागड्या मर्सिडीज गाडीवर बैल गाडीचे चिन्ह सर्वाना आकर्षण ठरले असून आजही शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे असा संदेश भुपेंद्रसिंग यांच्या विवाहातून दिला आहे,त्यामुळे साहजिकच नवरदेवसाठी सजवलेली शेतकरी लूकवाली मर्सडिझ गाडी पंचक्रोशीत सगळ्यांचेच आकर्षक ठरली.

Protected Content