भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस खात्यात नोकरी लावून देतो असे सांगून द्वारका नगरातील दोन जणांकडून १४ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अखेर चौकशी अंती तीन जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय नारायण सोनवणे वय ३५ रा. द्वारका नगर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. विजय सोनवणे यांचा भावास आणि याच परिसरात राहणारा आकाश प्रकाश भालेराव यांना पोलीस खात्यात नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवत राघवेंद्र महादेव पाटील, गौरी राघवेंद्र पाटील दोन्ही रा. मुंबई आणि अनिल सपकाळ रा. कल्याण या तीन जणांनी दोघांकडून १४ जून २०२२ रोजी १४ लाख रूपये घेवून फसवणूक केली. दोघांना नोकरी न लावता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विजय सोनवणे यांनी गुरूवारी २१ मार्च रोजी रात्री ८ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात राघवेंद्र महादेव पाटील, गौरी राघवेंद्र पाटील दोन्ही रा. मुंबई आणि अनिल सपकाळ रा. कल्याण या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड हे करीत आहे.