जवानांना दरवर्षी कुटुंबासोबत घालवता येणार 100 दिवस ; शहांकडून दिवाळी गिफ्ट

crpf jawan

नवी दिल्ली प्रतिनिधी । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना एक महत्त्वाचा आदेश नुकताच दिला आहे. सीआरपीएफच्या जवानांना कमीत कमी 100 दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल, अशा पद्धतीने त्यांची नियुक्ती करा, असे शहा यांनी सांगितले. ऐन दिवाळीच्या तोंडावर गृह मंत्रालयाने दिलेल्या या गिफ्टमुळे सीआरपीएफ जवानांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांना सध्या आपल्या कुटुंबासोबत अंदाजे 75 ते 80 दिवसांचा वेळ घालवता येतो. यामध्ये 60 पगारी रजा आणि 15 कॅज्युअल लीव्ह्सचा समावेश आहे. पहिल्या दोन मुलांच्या जन्मासाठी जवानांना 15 दिवसांची पॅटर्नल लीव्ह (पालकत्वासाठी रजा) मिळण्याची तरतूद आहे. शाहा यांनी दिलेल्या सूचना अंमलात आणल्यास जवानांना त्यांच्या कुटुंबांसोबत आणखी वेळ घालवता येईल. यामुळे जवानांना कौटुंबिक जीवनात सुधारणा करण्यास फायदा होणार आहे. सीमेवर देशाचं संरक्षण करताना वैयक्तिक जीवनाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्यामुळे अनेकदा जवानांच्या कुटुंबाची परवड होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या सूचना अमलात आणल्यास जवानांना त्यांच्या कुटुंबाबरोबर अधिक वेळ घालवता येईल. यामुळे जवानांना खूप फायदा होणार असून, त्यांना अनेक कौटुंबिक समारंभांना उपस्थित राहता येणार आहे, तसेच या निर्णयामुळे जवानांना प्रेरणा मिळेल आणि सरकार आपल्याबद्दल विचार करतेय, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल, असे मत एका अधिकार्‍याने व्यक्त केले आहे.

Protected Content