५ कामचुकार ग्रामसेवकांचे निलंबन

 

जळगाव : प्रतिनिधी । कामात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जि प मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ५ कामचुकार ग्रामसेवकांना निलंबित केले आहे यात अमळनेर तालुक्यातील २ व यावल तालुक्यातील २ ग्रामसेवकांच्या समावेश आहे .

संबंधित पंचायत समित्यांकडून या ग्रामसेवकांच्या निलंबनाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले होते . यावल तालुक्यातील सावखेडसीम येथील ग्रामसेवक मकरंद सैंदाणे यांना परस्पर बँकेतून पैसे काढून खर्च करणे , घरकुल योजना अंमलबजावणीतील हलगर्जीपणा , वसुली न करणे , तपासणीसाठी दप्तर उपलब्ध न करून देणे या कारणांमुळे निलंबित करण्यात आले आहे . किनगाव खुर्द येथील तत्कालीन ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळे यांनाही घरकुल योजना अंमलबजावणीतील हलगर्जीपणा आणि जलजीवन मिशनचे काम न केल्याने निलंबित करण्यात आले आहे .

अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुकचे ग्रामसेवक शेखर पाटील यांना कुऱ्हे खुर्दचा पदभार न देणे आणि दप्तर गहाळ केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे सारबेट येथील ग्रामसेवक रवींद्र पवार यांना वरिष्ठांचे आदेश न पाळणे व तपासणीसाठी दप्तर उपलब्ध न करून देणे या कारणांमुळे निलंबित करण्यात आले आहे .

पारोळा तालुक्यातील ढेकू खुर्द येथील ग्रामसेवक हितेंद्र देशमुख यांना जुनोने येथे नेमणूक असताना सतत गैरहजर राहणे आणि गैरव्यवहाराच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे

जिल्हा परिषदेच्या या कारवाईमुळे कामचुकार ग्रामसेवकांची धाबे दणाणले आहे ग्रामसेवक मुख्यालयी हजर राहत नसल्याने ग्रामस्थांची कामे अडचणीत येतात अशा तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत .

Protected Content