३५० किमीसाठी रुग्णवाहिकेचे भाडे १ लाख २० हजार !

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गुरगाव ते लुधियानातील रुग्णालयात रुग्ण नेण्यासाठी एका रुग्णवाहिकेने तब्बल १.२० लाख घेतले. हे अंतर ३५० किलोमीटर इतकं आहे. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाच्या मुसक्या आवळल्या.

 

 

 

देश कोरोनाच्या संकटात  असताना काळाबाजार आणि लूट करण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात वैद्यकीय उपकरणं आणि औषधांचा तुटवडा असल्याने अनेक जण आपल्या नातेवाईकांचा जीव वाचवण्यासाठी चढ्या किंमती देत आहेत. नातेवाईकांच्या हतबलतेचा फायदा घेत अनेकांनी लूट चालवली आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवीर इंजेक्शन अशा बऱ्याच गोष्टी चढ्या किंमतीने विकल्या जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार दिल्लीत समोर आला आहे.

 

 

दिल्ली सरकारनं शहरात खासगी रुग्णवाहिका सेवेसाठी बिल रक्कम निश्चित केली आहे.  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमांचं उल्लंघन करण्याऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. असं असूनही एका रुग्णाला गुरगावहून लुधियाना येथे नेण्यासाठी तब्बल १.२० लाख घेतले. सुरुवातीला आरोपी १.४० लाखांवरच अडून बसला होता.  ऑक्सिजन सिलेंडर असल्याचं सांगत अनेक विनवण्या केल्यानंतर त्याने २० हजार रुपये कमी केल्याचं रुग्णाच्या मुलीने सांगितलं.

 

 

पोलिसानी मिमोह कुमार बुंदवाल याला अटक केली आहे. हा पेशाने डॉक्टर असून  दोन वर्षांपासून रुग्णवाहीकेचा व्यवसाय करत आहे. त्याला दिल्लीच्या इंदरपुरी येथून अटक करण्यात आली आहे.  एक महिन्यांपासून हा रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

 

पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने रुग्णाच्या नातेवाईकांचे पैसे परत केलेत. पोलिसांनी रुग्णवाहिका सेवा कंपनीच्या बँकेची माहिती घेतली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत

 

Protected Content