कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनची गरज कमी करणाऱ्या औषधाची निर्मिती

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । डीआरडीओच्या औषधामुळे कोरोना रुग्णांची  ऑक्सिजनची गरज आता कमी होणार आहे. या औषधाला 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव दिलं आहे.  या औषधाच्या निर्मितीची जबाबदारी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला देण्यात आली आहे.

 

 

 

कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी सर्वाधिक गरज ऑक्सिजनची असते. त्यामुळे गेल्या काही दिवसात अनेक राज्यांनी वाढीव ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. न्यायालयानेही या बाबीची गंभीर दखल घेत राज्यांना योग्य तो ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधीच ऑक्सिजन पुरवठा कमी होत असताना वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे.

 

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोनावर उपचारासाठी  या  औषधाला मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इंस्टीट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसन अँड अलायड सायन्स आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने एकत्रितपणे तयार केलं आहे.

 

 

 

या औषधाचं क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पार पडलं आहे. ज्या रुग्णांना या औषधाची मात्रा दिली होती. ते रुग्ण लवकर बरे झाल्याचं दिसून आलं आहे. तसेच त्या रुग्णांना ऑक्सिजन गरज जास्त भासली नसल्याचंही निदर्शनास आलं आहे. रुग्णही लवकर बरे होत असल्याचं समोर आलं आहे.

Protected Content