Home आरोग्य ७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया ; १० वर्षांपासून शरीरात...

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया ; १० वर्षांपासून शरीरात असलेला स्टेन्टही काढला

0
4


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ७० वर्षीय वृद्धाच्या मूत्राशयाच्या परिसरात तयार झालेले प्रत्येकी सुमारे सहा सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे खडे आणि तब्बल दहा वर्षांपासून शरीरात असलेला स्टेन्ट महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील युरोलॉजी तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे काढला. विशेष म्हणजे, आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या दोन टाक्यांमध्ये ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

संबंधित वृद्ध रुग्णावर सुमारे दहा वर्षांपूर्वी मुतखड्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या उपचाराचा एक भाग म्हणून त्यांच्या मूत्रमार्गात स्टेन्ट बसविण्यात आला होता. साधारणपणे शस्त्रक्रियेनंतर महिनाभराच्या कालावधीत हा स्टेन्ट काढणे आवश्यक होते. मात्र, काही कारणांमुळे तो काढण्याचे राहून गेले आणि तब्बल दहा वर्षे तो शरीरातच राहिला. कालांतराने या स्टेन्टभोवती खडे तयार होऊ लागले. त्यामुळे रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने त्यांनी उपचार घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर रुग्णाने महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत केळकर आणि डॉ. हर्षद चव्हाण यांच्याकडे तपासणी केली. आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि तपासण्यांनंतर मूत्राशयाच्या परिसरात प्रत्येकी सुमारे सहा सेंटीमीटर आकाराचे दोन मोठे खडे तसेच दहा वर्षांपासून शरीरात असलेला जुना स्टेन्ट असल्याचे निदान झाले.

रुग्णाचे वय आणि दीर्घकाळ शरीरात राहिलेल्या स्टेन्टमुळे निर्माण झालेली गुंतागुंत लक्षात घेऊन डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचे काळजीपूर्वक नियोजन केले. यासाठी पीसीसीएलटी (पर्क्युटेनिअस सिस्टोलिथोट्रेप्सी) आणि पीसीएनएल (पर्क्युटेनिअस नेफ्रोलिथोट्रेप्सी) या आधुनिक शस्त्रक्रिया पद्धतींचा वापर करण्यात आला. या तंत्रांच्या साहाय्याने दोन्ही मोठे खडे फोडून बाहेर काढण्यात आले. त्याचबरोबर दहा वर्षांपासून शरीरात असलेला स्टेन्टही यशस्वीरीत्या काढण्यात डॉक्टरांना यश आले. या संपूर्ण शस्त्रक्रियेत केवळ दोन टाके देण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात समाधानकारक सुधारणा झाली आहे. वयस्कर रुग्णावर दीर्घकाळ शरीरात राहिलेल्या स्टेन्टमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने यशस्वी उपचार करण्यात आल्याने रुग्णाला दिलासा मिळाला आहे.

ही शस्त्रक्रिया महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षद चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी, डॉ. शुभम चौधरी, डॉ. आर.के. तिवारी आणि डॉ. सुष्मीता रे यांच्या तज्ज्ञ पथकाने यशस्वीरीत्या केली. याबाबत डॉ. हर्षद चव्हाण यांनी सांगितले की, मूत्रमार्गात बसविण्यात येणारा स्टेन्ट हा कायमस्वरूपी उपचाराचा भाग नसतो. डॉक्टरांनी सांगितलेल्या कालावधीत तो काढणे किंवा आवश्यकतेनुसार बदलणे अत्यंत महत्त्वाचे असते. स्टेन्ट काढण्यास विलंब झाल्यास त्यावर खडे तयार होणे, संसर्ग होणे तसेच मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होण्यासारख्या गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर नियमित वैद्यकीय तपासणी करणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.


Protected Content

Play sound