सराईत गुन्हेगार दादू धोबीवर एमपीडीए ! : नाशिकला स्थानबध्द

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील सराईत गुन्हेगार दादू धोबी याला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वीच अमळनेर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतलेले पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे, यांनी अमळनेर येथील गुन्हेगारीचा आढावा घेतला. यात अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग अमळनेर राकेश जाधव यांचे मार्गदर्शन घेतले. पोलीस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील काही हिस्ट्रीशिटर्स गुन्हेगारीत अतिशय सक्रिय आहेत. त्यातील दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ (धोबी) रा.जुना पारधी वाडा, सुभाष चौक,अमळनेर हा अतिशय सक्रिय असल्याचे दिसून आले.
लोकांची लूटमार करणे चाकू, सुरे तलवार घेवून लोकांमधे दहशत निर्माण करणे, न्यायालयीन कोठडीत असतांना पोलीसांच्या रखवालीतून पळून जाणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कर्मचार्‍यांवर हल्ला करणे. असे अनेक गुन्हे त्याने केलेले आहेत.
असे त्याच्यावर विविध कायदा व कलमान्वये ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे कोणीही साक्षीदार त्याच्याविरुद्ध न्यायालयात साक्ष देण्यास तयार होत नसे.
अमळनेर रहिवासी निमूटपणे त्याचे गुन्हे सहन करीत होते.

दरम्यान, ही जनसामान्यांची भावना जाणून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस अधीक्षक जळगाव व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने याला मंजुरी मिळाली असून दादू धोबी याला नाशिक सेन्ट्रल जेल येथे स्थानबद्धते साठी पाठविण्यात आले आहे. नियमानुसार तो एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द अवस्थेत राहणार आहे. या कारवाईचे स्वागत होत असून पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ही कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना या कामात त्यांच्या मुख्य टिममधील पोहेका /किशोर पाटील, पोना/दिपक माळी, पोका/रविंद्र पाटील, पोहेका शरद पाटील,
पोका/सिद्धांत सिसोदे, पो.उ.नि.अनिल कभुसारे, पोहेका प्रमोद पाटील, पोका/जितेंद्र निकुंबे, पोका/कमलेश बाविस्कर यांनी मदत केली आहे.

Protected Content