१ मेपासून नव्हे ; पुढच्या ६ महिन्यात लस उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन

 

मुंबई : वृत्तसंस्था  । राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे मोफत लसीकरण लगेच १ मेपासून सुरु होणे शक्य नाही ,  पुढच्या ६ महिन्यात लस उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन  असल्याची माहिती आज आरोग्यमंत्र राजेश टोपे यांनी दिली

 

केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मे पासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र लसीकरणाविषयी चर्चा सुरू झाली

राज्यात  तरूण वर्गाने लसीकरणाची तयारी देखील केली होती. मात्र, राज्यात या वर्गासाठी १ मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचं  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये  निर्णय झाल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. लसीचे डोस उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असला, तरी येत्या ६ महिन्यात १८ ते ४४ या वयोगटातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी ीदिली.

 

“१ मे ला राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. आज लगेच आपल्याला लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत. मे अखेरपर्यंत लसीचे डोस उपलब्ध होणार असतील, तर त्यांना अचानक एकाच वेळी लसीचे डोस देता येणार नाहीत. त्यामुळे तरुणांना माझं नम्र आवाहन आहे की आपण सगळ्यांना मोफत लसीकरण करतो आहोत. पण आता समजुतदारीने काम घ्यावं लागणार आहे. नोंदणीसाठी कोविन अॅप वापरणं सक्तीचं आहे. त्यामुळे आधी नोंदणी करूनच नोंदणी केंद्रावर जाता येणार आहे. कुणीही थेट केंद्रावर जाऊन लसीची मागणी करू नये. केंद्र सरकारने नोंदणी बंधनकारक केली आहे”, असं यावेळी राजेश टोपे म्हणाले.

“आपल्याला इच्छा असूनसुद्धा लसी उपलब्ध होत नसल्यामुळे १ मे ला लसीकरण सुरू करता येणार नाहीये. पण आपण यावर काम करत आहोत. ५ कोटी ७१ लाख लोकांना लसीकरण करायचं आहे. त्यासाठी वरीष्ठ मंत्र्यांची एक समिती याचं सूक्ष्म नियोजन करत आहे. १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ अशा वर्गवारीवर काम सुरू आहे. ३५ ते ४४ हा गट आधी घेता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. यातले सहव्याधीचे रुग्ण आधी घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे. १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र वेगळे असतील आणि ४५ वयोगटाच्या पुढचे केंद्र वेगळे असतील”, अशी देखील माहिती राजेश टोपे यांनी  दिली.

Protected Content