देशात १५० जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाउन ?

 

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलेला असून अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केला असताना केंद्राकडूनही लॉकडाउनचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे.

 

आरोग्य सुविधांवर ताण आलेले जिल्हे जिथे पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तिथे लॉकडाउन लागण्याची गरज असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी आरोग्य मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र अंतिम निर्णय राज्य सरकारांसोबत चर्चा केल्यानंतरच केंद्राकडून घेतला जाणार आहे.

 

या प्रस्तावात नंतर बदल केला जाऊ शकतो मात्र या जिल्ह्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत बैठकीत मांडण्यात आलं. “साखळी तोडण्यासाठी जास्त पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुढील काही आठवडे कडक लॉकडाउनची गरज,” असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

 

भारतात मंगळवारी रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.

 

 

Protected Content