बजरंग बोगद्याजवळ अतिक्रमण पथकावर भाजीपाला विक्रेत्यांकडून दगडफेक !

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग बोगद्याजवळ लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न आणि पोलीसांशी धक्काबुक्की केल्या प्रकार आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. यात एक मनपा कर्मचारी जखमी झाला आहे, अशी माहिती उपायुक्त संतोष वाहूळे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यानचा कालावधी ठरवून दिलेला आहे. यात भाजीपाला विक्रेत्यांचाही समावेश आहे. आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कारवाईसाठी बजरंग बोगद्याजवळ रवाना झाले. दरम्यान ११.३० वाजूनही दुकाने सुरू असल्याचे महापालिका कर्मचारी यांना दिसून आले. यावेळी उपायुक्त संतोष वाहूळे हे देखील उपस्थित होते. दरम्यान उपायुक्त वाहुळे यांनी भाजीवाला विक्रेत्यांशी संवाद साधुन मानराज पार्क समोर दिलेल्या मोकळ्या जागेवर दुकाने लावण्याचे सांगितले. याचा राग भाजीपाला विक्रेत्यांना आला. यात काही टवाळखोर मुलांनी दोन ते तीन दगडफेक केली. यात एक कर्मचारी जखमी झाला आहे. हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. भाजीपाला विक्रेत्यांनी पोलीसांशी देखील धक्काबुक्की करत हमरीतुमरी झाली. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. 

Protected Content