निवडणूक आयोगाचा निर्णय ; मतमोजणीसाठी आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । २ मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालासंदर्भात निव़डणूक आयोगाने  मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक  केले आहे.

 

निवडणूक आयोगाने एक आदेश काढला आहे. २ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पाँडिचेरी या पाच राज्यांमध्ये मतमोजणी आणि विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.  मतमोजणी केंद्रावर गर्दी करण्यास बंदी आहे.मतमोजणी केंद्र पूर्णपणे सॅनिटाईझ करण्याचेही आदेश दिले आहेत.

 

 

मतमोजणी अधिकाऱ्यांची बैठकव्यवस्था अशी असावी की दोन अधिकाऱ्यांच्या मधे एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. त्याचबरोबर जिंकणाऱ्या उमेदवारास दोनपेक्षा जास्त व्यक्तींना सोबत आणायला परवानगी नाही.

 

यापूर्वी निवडणूक आयोगाने  २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने करोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरलं पाहिजे, असं मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केलं.

 

निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत  २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मद्रास हायकोर्टाने आयोगाला दिला होता.

Protected Content