रात्री गळफास घेतला अन् सकाळी रिपोर्ट निगेटीव्ह आला !

जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा कोविड रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णाने रात्री एकच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर आज सकाळी त्याचा स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या रूग्णाचा हकनाक बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या जिल्हा कोविड रुग्णालयात कडुबा नकुल घोंगडे (५०, रा. पहूर, ता. जामनेर) या कोरोना बाधित रुग्णाने वॉर्ड क्रमांक गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या रूग्णाने मध्यरात्रीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बर्‍याच वेळानंतर कर्मचार्‍यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. महिला प्रसूतीगृहाच्या जवळ आपल्याकडे असणार्‍या मफलरचा गळफास करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, मृताच्या कुटुंबियांना आज पहाटे चार वाजता फोन करून त्यांच्या आत्महत्येबाबतची माहिती देण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांच्या भावाने आपल्या वडिलांच्या मृत्यूसठी प्रशासनाला जबाबदार धरले. याप्रसंगी ते म्हणाले की, कडुबा घोंगडे यांच्या किडनीवर सूज आल्याने त्यांनी स्थानिक रूग्णालयात दाखविले. याप्रसंगी त्यांना पुढील उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल कॉलेज) रूग्णालयात पाठविण्यात आले. येथे बुधवारी सायंकाळी सात वाजता ते आले असता दोन तास त्यांना कुणी विचारले देखील नाही. यानंतर काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. दरम्यान, कडुबा घोंगडे यांनी रात्री एकच्या सुमारास आत्महत्या केल्यानंतर तब्बल तीन तासांनी माहिती देण्याचे कारण काय असा प्रश्‍न त्यांच्या मुलाने प्रसारमाध्यमांशी बोलतांना उपस्थित केला.

दरम्यान, अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे कडूबा धोंडगे यांचा स्वॅब रिपोर्ट आज सकाळी आला असून यात ते कोरोना निगेटीव्ह असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे धोंडगे यांनी तणावातून आत्महत्या केली असून यासाठी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. तर, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन तक्रार नोंदविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

Protected Content