१० बँकांच्या एकत्रीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सार्वजनिक क्षेत्रातील आणखी १० बँकांच्या एकत्रीकरणाला मंजुरी दिली असून यांच्या एकत्रीकरणातून चार नवीन बँका अस्तित्वात येणार आहेत.

आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. येत्या एप्रिलपासून एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा ऑगस्टमध्ये केली होती. त्याला आज कॅबिनेटने मंजुरी दिली. या निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ वर येणार आहे.

या निर्णयानुसार पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील तीन बड्या बँकांची एक मोठी बँक अस्तित्वात येईल. कॅनरा बँक आणि सिंडिकेट या दोन बँकांचे विलिनीकरण होणार आहे. युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक यांची मिळूल देशातील पाचवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येणार आहे. तर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचे एकत्रीकरण होणार आहे.

पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चारही बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक एसबीआयनंतरची देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. कॅनरा बँक आणि सींडिकेट बँक यांचं विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल.

Protected Content