चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. चार दिवसांपूर्वीही एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती.

 

देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने आधीच सामान्यांना फटका बसला आहे. त्यानंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे.

 

२५ रुपयांची वाढ झाल्याने आता १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन दर आजपासून लागू होत आहेत. याआधी २५ फेब्रुवारी रोजी किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली होती. तसेच, ४ फेब्रुवारीला २५ रुपयांची वाढ झाली होती. तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी दर वाढले होते.

 

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजीचे दर बदलतात. जानेवारी महिन्यात तेल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात वाढ केली नव्हती. पण फेब्रुवारीमध्येच एलपीजी गॅसच्या किंमती जवळपास १०० रुपयांनी वाढल्या. तर, डिसेंबर महिन्यात वाढलेले दर पकडून साधारण २०० रुपयांनी एलपीडी गॅस महाग झालाय.

Protected Content