शेकडो महिलांनी ४०० मीटर साडी केली “पूर्णा” नदीला अर्पण…!

मलकापूर – अमोल सराफ  |  पती परमेश्वराला दीर्घायुष्य लाभून सुहासिनींना अखंड सौभाग्य लाभो… या सात्विक भावनेतून अग्रवाल समाजातील महिला संघटनांच्या वतीने महादेवाला अभिषेक करीत ५६ वेगवेगळ्या पदार्थांचा प्रसाद व पूर्णीमायीला ५१ साड्या मोठ्या श्रद्धेने भेट चढविण्यात आल्या. या धार्मिक कार्यात तब्बल ३०० महिलांनी सहभाग घेतला.

 

परिसरातील नागरिकांना कधीही पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये या उदात्त भावनेतून नदीपात्रातील पाणी कधीही कमी होऊ नये ते भरभरून वाहावे असे साकडे सुद्धा यावेळी घालण्यात आले. धूपेश्वर येथे प्रथमच मोठ्या भक्ती भावातून  हा सोहळा पार पडला.

अग्रवाल महिला संमेलनाद्वारा संचालित अग्रणारी प्रांतीय महिला असोसिएशन, अग्र-नारी प्रांतीय महिला असोसिएशन बुलढाणा जिल्हा व बुलढाणा जिल्हा अग्रवाल महिला संमेलन शाखा मलकापूरच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर तालुक्यातील धूपेश्वर येथे श्रावण महिन्यानिमित्त अग्रवाल समाजातील महिला भगिनींनी महादेवाला अभिषेक करीत ५६ वेगवेगळ्या पदार्थांचा प्रसाद चढविला.  त्याचप्रमाणे पूर्णामायीला ५१ साड्या चढवून शृंगार करीत पूर्णा मायीचे पूजन केले. दरम्यान, समस्त महिलांना अखंड सौभाग्य लाभावे, पती परमेश्वराला दीर्घायुष्य लाभो असे साकडे घालण्यात आले.  याप्रसंगी तब्बल ५१ साड्या एकमेकांना जोडून एकत्रित केलेली साडी पूर्णमाईच्या पुलावरून एका टोकाकडून दुसऱ्या टोकावर नेत पूर्णीमायीला अर्पण करण्यात आली. यावेळी शृंगाराचे साहित्य सुद्धा नदीपात्राच्या काठावर भेट देण्यात आले.  पूर्णामायी ही मलकापूर वासियांची तृष्णा भागवणारी जीवनदायीनी असल्याने मानवी जीवनाकरिता अत्यंत आवश्यक बाब आहे. पूर्णामायी बारामाही दुथळी भरून वाहावी जेणेकरून परिसरात कधीही पाणीटंचाई निर्माण होऊ नये असे साकडे सुद्धा यावेळी महिलांच्या वतीने घालण्यात आले. या सोहळ्यात संघटनेच्या तब्बल ३०० महिला प्रामुख्याने सहभागी झाल्या होत्या. यावेळी मलकापुरातील सुनील अग्रवाल तर कुऱ्हा काकोडा येथील राजू खंडेलवाल यांनी या महिला भगिनींना सोहळ्याच्या यशस्वीते करिता सहकार्य केले.

 

Protected Content