स्वातंत्र्य दिनी जिल्हा पोलीस दलातर्फे‍ विविध कार्यक्रम 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनाबाबत आज पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात बैठक घेण्यात आली.

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरात हर घर तिरंगा, अमृत मॅरेथॉन व अमृत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे म्हणाले की, जळगाव जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने हर घर तिरंगा, अमृत मॅरेथॉन आणि अमृत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता १० किलोमीटरची अमृत मॅरेथॉन राहणार आहे. यात शहरातील महाविद्यालय, विद्यालय आणि खासगी संस्था यातील विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.

त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी सकाळी शासकीय तिरंगाला मानवंदना दिल्यानंतर सकाळी ११ वाजता शहरात ७५ फूट तिरंगा ध्वज यासह विविध पथनाट्य, प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध कार्यक्रमांमध्ये नागरीकांसह तरूणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पोलीस अधिक्षक मुंढे यांनी केले आहे.

कार्यक्रमांसंदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे महाविद्यालय, विद्यालय आणि खासगी संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ८ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content