स्वदेशी तंत्रातुन विकसित हायपरसोनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी

भुवनेश्वर वृत्तसंस्था –: ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसोनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.

हायपरसोनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची ही चाचणी होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने हे व्हेइकल विकसित केले आहे. आज सकाळी ११ वाजून तीन मिनिटांची चाचणी करण्यात आली. त्यासाठी अग्नि मिसाइलचा बूस्टर म्हणून वापर करण्यात आला.

चाचणी यशस्वी होण्याचा अर्थ हाच आहे की, पुढच्या पाचवर्षात स्क्रॅमजेट इंजिनसह हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करता येईल . या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली

अन्य क्षेपणास्त्रे बॅलेस्टिक ट्रॅजेक्टरी फॉलो करतात. म्हणजेच सहजतेने त्या क्षेपणास्त्रांच्या मार्गावर लक्ष ठेवता येते. अशा क्षेपणास्त्रांमुळे शत्रूला तयारी करण्याचा आणि प्रतिहल्ला करण्याची संधी मिळते. पण हायपरसोनिक शस्त्राचा असा कुठला निश्चित मार्ग नसतो. त्यामुळे शत्रूला हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या मार्गाचा अंदाज लावता येत नाही. वेग इतका प्रचंड असतो की, शत्रूला कळण्याआधी लक्ष्यावर प्रहार झालेला असेल. म्हणजेच शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदता येते.

Protected Content