जळगाव, प्रतिनिधी । शहरातील दोन तरूणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. यात निहाल शेख मोईनुद्दीन(२५, रा़ गेंदालाल मिल) व शैलेश नाना पाटील (२५, रा़ खडकेचाळ, शिवाजीनगर) या दोघा संशयितांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले यांनी सोशल मीडियावर कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जावू नये व तेढ निर्माण होवू नये तसेच आक्षेपार्ह मजकूर टाकू नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा दिला होता. दरम्यान, शुक्रवारी सायबर सेल पोलिसांना माहिती मिळाली की, गेंदालाल मिल परिसरातील निहाल शेख मोईनुद्दीन हा तरूण त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह मजकूर टाकून प्रसारित करीत आहे़. सायबर पोलिसांनी त्वरित ही माहिती शहर पोलिसांना दिली़. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश शिरसाळे, मनोज पाटील, नरेंद्र ठाकरे, दीपक सोनवणे, रतन गिते, तेजस मराठे, कमलेश पाटील आदींनी दुपारी साडे तीन वाजता गेंदालाल मिलमध्ये जावून निहाल यास ताब्यात घेतले. नंतर त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शिवाजी नगर भागातील खडकेचाळ येथील रहिवासी शैलश पाटील हा तरूण त्यांच्या मोबाईलवरून व्हॉटस्अॅप गु्रपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून ती प्रसारित करीत होता़ ही माहिती शहर पोलिसांना मिळताच दुपारी त्यासही ताब्यात घेण्यात आले़ नंतर त्याच्याविरूध्दही शहर पोलीस ठाण्यात मनोज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे करीत आहेत़ तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर न टाकण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.