सुरतमध्ये मजूरांचा पुन्हा उद्रेक ; पोलिसांवर दगडफेक

सुरत (वृत्तसंस्था) गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील मोरा गावात आज परप्रांतीय मजूरांनी पुन्हा एकदा गर्दी करत आपल्या गावी परत जाण्याची मागणी केली. यावेळी मोठा गोंधळ झाला तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.

 

पोलीस ठाण्यात जमलेल्या कामगारांपैकी बहुतांश कामगार उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा या राज्यांमधले होते. जिल्हा प्रशासनाने आमची घरी जाण्याची सोय करावी अशी मागणी हे कामगार करत होते. पोलीस ठाण्यात जमलेल्या या कामगारांनी दगडफेक करत परिसरातील वाहनांची नासधुसही केली. अखेरील पोलिसांनी तात्काळ अतिरीक्त कुमक मागवत १०० कामगारांना ताब्यात घेतले. रोजगार व कामधंद्यासाठी इतर राज्यात गेलेल्या कामगारांना आपल्या घरी परतण्यासाठी रेल्वेने विशेष सोय केली आहे. मात्र ज्या कामगारांकडे रेल्वेच्या तिकीटाचे पैसे नाहीत, त्यांची चांगलीच कुचंबणा होताना दिसत आहे. काही कामगारांनी तर शेकडो किलोमीटर पायी चालत जात आपले गाव गाठण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परप्रांतीय मजुरांचा प्रश्न हाताळण्यात केंद्र सरकारला पूर्णपणे अपयश आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

Protected Content