मंदाताई खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट

मुंबई प्रतिनिधी | भोसरी येथील बहुचर्चित भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आल्याने खळबळ उडालेली आहे.

एकनाथराव खडसे हे महसूल मंत्री असताना भोसरी येथील वादग्रस्त भूखंड त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. एकनाथराव खडसे यांना या प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर ईडीने सुद्धा या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात खुद्द एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे आणि गिरीश दयाराम चौधरी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यापैकी गिरीश दयाराम चौधरी हे सुमारे सव्वा तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत. एकनाथराव खडसे यांची ईडीने आधी चौकशी केलेली असली तरी मंदाताई खडसे मात्र अद्यापपर्यंत इडीसमोर हजर झालेल्या नव्हत्या.  त्यांनी आपण आजारी असल्याचे पहिल्यांदा कारण सांगितले होते तर दुसऱ्यांदा त्यांनी मुदत वाढवून मागितली होती. दरम्यान, सतत गैरहजर राहत असल्यामुळे आज मुंबई येथील सेशन कोर्टाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले असल्याची बातमी टीव्ही नाईन या मराठी वृत्त वाहिनीने दिली आहे.

मंदाताई खडसे यांनी याप्रकरणी आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून मुंबई सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला असून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे या वृत्तामध्ये म्हटले आहे.

Protected Content