जळगावाच्या देवेश भय्याने मिळविले आंतरराष्ट्रीय पातळीवरील 12 सुवर्णपदके

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रातही ऑनलाईनचीच चर्चा होती. साने गुरूजी नगरातील देवेश भय्या या अवघ्या 12 वर्षाच्या विद्यार्थ्याने ऑनलाईन परिक्षांची संधी हेरली आणि अवघ्या दहा महिन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करीत आतंरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांमधील गणिताच्या परिक्षांमध्ये यशस्वी होत 12 सुवर्ण पदके प्राप्त करीत जणू विक्रमच केला आहे.

अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परिक्षेत देवेश भय्याने 800 पैकी 800 गुण मिळवित ‘ग्रँड ऑनर अ‍ॅवार्ड मेडल’ प्राप्त करीत 12 व्या वर्षी या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट युथ मध्ये स्थान मिळविले आहे. थायलंड इंटर नॅशनल मॅथेमॅटिक्सऑलींपियाड, साऊथईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड या तीनही परिक्षेत त्याने प्रथम वर्ल्ड रँक मिळवित सुवर्णपदके मिळविली. सिंगापूर अ‍ॅन्ड एशियन स्कूलमध्ये मॅथ्स ऑलींपियाड, इंटरनॅशनल ज्युनियर मॅथ ऑलींपियाड, हाँग काँग इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाड, इंटरनॅशनल मॅथ कांगारु कॉम्पीटिशन, सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलींपियाड चॅलेंज, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलींपियाड एक्स नेक्स्ट लेव्हल या सहा परीक्षेत देवेशला ‘इंटरनॅशनल गोल्ड मेडल’ प्राप्त झाली आहे. या परिक्षांपैकी तीन परिक्षेत देवेशला ‘वर्ल्ड चॅम्पीयन’ होण्याचा सन्मान देखील लाभला.

वर्ल्ड इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलींपियाडमध्ये द्वितीय रँक तर आशिया इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलींपियाडमध्ये तृतीय रँक  (वर्ल्ड सेकंड रनर अप) हे स्थान प्राप्त करीत त्याने आणखी दोन सुवर्ण पदके पटकावली. या बारा सुवर्ण पदकाशिवाय याच कालावधीत देवेशला अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.8 वी) मध्ये प्रथम रँक तर अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.10 वी) मध्ये ‘ऑनर’चा बहूमान मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन मॅथ कॉन्टेस्टमध्ये त्याने ‘हायर डिस्टींग्शन’ तर पर्पल कामेंट मॅथ मीट 2020 चा तो ‘विजेता’ ठरला आहे.

‘अ‍ॅलन चॅम्प 2020 बेस्ट ब्रेन ऑफ इंडिया’ म्हणून देखील देवेशची निवड झाली आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकीन विद्यापीठाच्या सेट प्रीकॉलेज न्यूज लेटरमध्ये त्याचा छायाचित्रासह परिचय प्रकाशित करण्यात आला आहे. देवेश हा एल.एच.पाटील इंग्लीश मिडीयम स्कूलमधील सातवीचा विद्यार्थी असून साने गुरुजी कॉलनी परिसरातील व्यंकटेश कॉलनीमधील रहिवासी आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटेरियर डिझाईनर पल्लवी भय्या यांचा तो सुपूत्र आहे. गेल्या वर्षी देवेशला प्रधानमंत्री बालशक्ती  पुरस्काराने राष्ट्रपती व पंतप्रधानाच्या उपस्थितीत दिल्लीत गौरविण्यात आले होते.

 

Protected Content