सागर पार्कवरील स्वच्छतागृहाचे लोकार्पण

जळगाव, प्रतिनिधी | सागर पार्कवर महापालिका आणि सुप्रीम इंडस्ट्रीज यांनी संयुक्तरित्या उभारलेले अद्ययावत स्वच्छतागृह हे काळाची गरज आहेच. पण, याची निगा राखण्याचे आणि याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही जळगावकरांची आहे. नागरिकांसा सकारात्मक सहभाग असल्याशिवाय कोणतेही काम यशस्वी होत नाही. यामुळे जळगावकरांनी आता महापालिकेच्या प्रयत्नांना साथ देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते सागर पार्कवरील स्वच्छतागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी त्यांनी जळगाव शहरातील चार प्रमुख रस्त्यांसाठी उद्या निविदा प्रसिध्द करण्यात येत असून १० डिसेंबर नंतर या रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील दिली.

सुप्रीम इंडस्ट्रीजच्या सीएसआर निधीतून सागर पार्कवरी महापालिकेच्या मदतीने अद्ययावत स्वच्छतागृह उभारण्यात आले असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रभूदेसाई, सक्सेना, माजी महापौर ललीत कोल्हे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकातून वैशाली विसपुते यांनी जळगाव शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या ही अतिशय मर्यादीत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. तर सागर पार्कवरील स्वच्छतागृह हे संबंधीत समस्या दूर करणार असल्याचे प्रतिपादन केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, स्वच्छता हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. जळगाव व खरं तर कोणत्याही शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची समस्या तर आहेच पण पुरूषांसाठीची स्वच्छतागृहे देखील खूप कमी आहेत. हा शरीरधर्म असल्यामुळे पुरूषांना देखील या अडचणीचा सामना करावा लागतो. यातच सार्वजनीक स्वच्छतागृहांमध्ये नागरिक स्वच्छतेचे पालन करत नाहीत. प्रत्येक नागरिकाने आपले शहर सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. असे झाल्यास आपले जळगाव हे प्रगतीपथावरून वेगाने आगेकूच करू शकते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आपण एखाद्या सालदार गड्याप्रमाणे जनतेची सेवा करत असून त्यांच्या विश्‍वासाला पात्र ठरण्यासाठी कामांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना जळगावकरांची साथ मिळण्याची गरज आहे. शहरातील रस्त्यांची अतिशय खराब स्थिती पाहता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यातील प्रमुख चार रस्त्यांच्या कामांची निविदा ही उद्या प्रसिध्द करण्यात येत असून १० डिसेंबर नंतर याचे कामे सुरू करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केली.

Protected Content