पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पाळधी ता. धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चाहूल लागली असतांना याच्या प्रतिकारासाठी लसीकरण हेच एकमेव आयुध आपल्याकडे आहे. याचा विचार करता आगामी काळात लसीकरण हेच आपले मिशन असावे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून या आरोग्य केंद्राने जनतेच्या सेवेत रूजू होण्याआधीच कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा एक मापदंड प्रस्थापित केला असून आता याच्याच माध्यमातून परिसरातील जनतेला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर, जिल्हा प्रशासन कोरोनाच्या प्रतिकारासाठी सज्ज असून या अनुषंगाने जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे नमूद केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी पाळधीपासून जवळच पथराड रस्त्यावर अतिशय भव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याहस्ते याचे भूमिपुजन करण्यात आले होते. यानंतर कोविडच्या दुसर्‍या लाटेत या आरोग्य केंद्राने अतिशय उत्तम कामगिरी बजावली. या आरोग्य केंद्रात ऑक्सीजन बेडची व्यवस्था देखील करण्यात आली होती. याच्या माध्यमातून येथून शेकडो रूग्ण बरे होऊन गेलेत. तर येथे एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. या आरोग्य केंद्राचे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या माध्यमातून आता हे आरोग्य केंद्र पाळधीसह परिसरातील जनतेच्या सेवेत रूजू झाले आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून या प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर हा अतिशय प्रशस्त, हवेशीर आणि आरोग्यवर्धक असा असल्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, या परिसरात जास्तीत जास्त झाडे लाऊन त्याचे संगोपन करण्याची आवश्यकता आहे. या हॉस्पीटलला लागूनच अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथील कर्मचार्‍यांनी प्रत्येक व्यक्तीचे समाधान होईल आणि तो रोगमुक्त होईल यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले. तर कोरोनाची तिसरी संभाव्य लाट ही उंबरठ्यावर असतांना जिल्ह्यात लसीकरणाला गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, दोन्ही डोेस फक्त ८० टक्के लोकांनीच घेतले असून उरलेल्यांनी यासाठी तातडीने नोंदणी करावी. तर आजपासून १५ वर्षांवरील मुला-मुलींची नोंदणी सुरू झाली असल्याने पालकांनी आपल्या मुलांसाठी तातडीने रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन देखील केले. दर्जेदार आरोग्य सुविधा आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे आपण कोरोनाच्या दोन्ही लाटांचा यशस्वी प्रतिकार केला असून आता तिसर्‍या लाटेचाही प्रतिकार करू असा आशावाद व्यक्त करत त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक अमोल कासट, पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, उदय झंवर, गोकुळ लंके, माजी सरपंच शरद शिंदे, अण्णा पाटील, भागवान मराठे, शरद कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय सोनवणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील डॉ. विनय चौधरी व डॉ. प्रशांत गर्ग अरुण पाटील, धनराज कासट, शेरी सरपंच कैलास पाटील, मच्छीन्द्र सपकाळे, दत्तू ठाकूर, दिपक सावळे, सौरभ पाचपोळ, यांच्यासह  सर्व आरोग्य सेवक सेविका आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तर सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आणि सेविकांच्या हस्ते पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.  पालकमंत्र्यांनी हे आरोग्य केंद्र परिसरातील जनतेला वरदान सिध्द होणार असल्याचे प्रतिपादन केले. कोरोनाच्या आपत्तीमध्ये या केंद्राने केलेली कामगिरी अविस्मरणीय अशीच असून याच प्रकारे आगामी काळातही येथून जनतेला दर्जेदार सेवा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जोवर पदनिर्मिती होत नाही तोपर्यंत गणेश साळुंख-औषध निर्माण अधिकारी, सरला गुजर-आरोग्य सेविका, प्रदीप पवार-आरोग्य सहायक, स्नेहलता चुंबळे,-आरोग्य सहायिका, रवींद्र माळी-परिचर या कर्मचार्‍यांची जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी नियुक्ती आदेश दिलेले असून ते सेवेत रूजू झाले आहेत.

 

Protected Content