नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसेनेच्या मालकीवरून सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली असून आता याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
जून महिन्यात शिवसेनेत उभी फूट पडून सत्तांतर झाले होते. यानंतर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही गटांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ५ याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांमध्ये उपसभापतींनी शिंदे गटातील १४ आमदारांच्या बरखास्तीची नोटीस बजावली होती. याबाबत आज सुनावणी संपली आहे. तब्बल ९ महिने ही सुनावणी सुरू होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला आहे.
दरम्यान, शिंदे आणि ठाकरे यांच्यातील लढाईवर राज्यातील आगामी राजकीय घडामोडी अवलंबून राहणार आहेत. यामुळे या निकालात नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष बाब म्हणजे हा निकाल लागणार तरी केव्हा ? हाच मोठा सस्पेन्स आता निर्माण झाला आहे.