संभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्री व्हावा : खेडेकर

सिंदखेडराजा प्रतिनिधी । २०१९च्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडने पूर्ण ताकदीनिशी उतरून मुख्यमंत्रीपद मिळवावे अशी अपेक्षा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली. ते येथील जिजाऊ जन्म सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

येथील जिजाऊ सृष्टीवर शनिवारी आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळयाप्रसंगी शिवधर्मपीठावरुन मार्गदर्शन करताना पुरूषोत्तम खेडेकर यांनी विविध विषयांना स्पर्श केला. ते म्हणाले की, २०१९ चा मुख्यमंत्री ठरवण्याची ताकत आपल्यात निर्माण करायची आहे. संभाजी ब्रिगेड पक्षाने लोकसभा आणि विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवाव्यात. या देशात आरएसएसचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री होऊ शकतो तर संभाजी ब्रिगेडचा का नाही ? असा खडा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. तर मराठा समाजाला सरकारने देऊ केलेले १६ टक्के आरक्षण कायमस्वरूपी टिकणारे नसल्याचे प्रतिपादनही खेडेकर यांनी केले.

या वेळी विचारपीठावर अभिनेता डॉ. अमोल कोल्हे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खा. छत्रपती संभाजी राजे भोसले, खा. प्रतापराव जाधव, माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, कमलेश जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई पाटील, आ. राहुल बोंद्रे, आ. डॉ शशिकांत खेडेकर, मनोज आखरे, पुरूषोत्तम कडू, लेफ्ट. कर्नल राजेंद्र निंबोरकर, रविकांत तुपकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, यांची उपस्थिती होती.

Add Comment

Protected Content