संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राज्यपालांनी सरकारची अडवणूक करु नये. हा राजकीय दबावाचाच  प्रकार असतो. राजभवन सरकारच्या मदतीसाठी असतं, पाय खेचण्यासाठी नसतं. पाय खेचले तर गुंत्यात अडकून पडाल असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला आहे. ते दिल्लीत  माध्यमांशी बोलत होते.

 

“राज्यपालांनी लोकनियुक्त सरकार ज्याने घटनेनुसार शपथ घेतली आहे त्यांची राजकीय कारणासाठी अडवणूक करु नये. मग ते विधानपरिषद सदस्यांच्या किंवा एमपीएससीसंबंधी नियुक्त्या असतील. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. त्यांचे बोलवते धनी कोणी इतर असतं. राज्यपालांनी अशा वादात पडू नये. पण महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हे दिसत आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

पुढे त्यांनी म्हटलं की, “राज्यपालांना कोणी हस्तक्षेप करायला लावत आहे का हे पहावं लागेल. जी कामं मंत्रिमंडळाची, मुख्यमंत्र्यांची आहेत त्यात घुसण्याचा प्रयत्न होत असल्याचं नवाब मलिकांनी सांगितलेलं मी ऐकलं. हे घटनाविरोधी आहे. राज्यपालांना कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी गाव स्तरावर दौरे काढण्याची गरज नाही. इतर राज्यांमध्येही पूर आले आहेत. पण भाजपाशासित इतर राज्यांमध्ये राज्यपाल दौरे काढताना दिसत नाहीत. हे पाहिल्यानंतर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील राज्यपाल असं का वागत आहेत हे समजेल किंवा असं वागण्यास का प्रवृत्त केलं जात आहे”.

“राज्यपालांचं काम मर्यादित स्वरुपातील आहे. त्यांनी कॅबिनेटच्या शिफारसी, निर्णयांचं पालन करावं तसंच सरकारच्या कामात हस्तक्षेप करु नये असं घटनेत आहे. त्यांनी हे नियम पाळलं तर बरं पडेल,” अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

 

“केंद्राकडून जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा असून आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. कालची मदत ही राज्य सरकारने केलेली आहे. आम्ही पॅकेज हा शब्द वापरत नाही. जेवढी गरज आहे तेवढं द्यावं. विमा कंपन्यासंदर्भात आम्ही काही भूमिका घेतल्या आहेत. अनेक भागांत नुकसान झालं असून विमा कंपन्यांचं कार्यालयच वाहून गेलं आहे. अनेकांची कागदपत्रं वाहून गेली असून दावा करताना अडचणी येत आहेत. अशावेळी केंद्राने विमा कंपन्यांना सूचना द्याव्यात आणि तोडगा काढावा अशी विनंती निर्मला सीतारमण यांना केली आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात छोट्या उद्योगांचं मोठं नुकसान झालं असून नारायण राणे यांच्याकडे यासंबंधी खातं आहे यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “आम्ही आधीच मागणी केली आहे. महाड किंवा इतर मोठे उद्योग असणाऱ्या ठिकाणी औद्योगिक विभागाला फटका बसला आहे. हे सर्व भाग महाराष्ट्रासह देशालाही मोठा महसूल मिळवून देतात. त्यासंदर्भात केंद्राने वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही. त्यातील बराचसा महसूल केंद्राला जात असतो”.

 

“सध्या आम्ही महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य, सरकार चालवताना फक्त पक्ष नाही तर मनही जवळ यावी लागतात. त्यादृष्टीने काही पावलं पडत असतील तर लोक स्वागत करतील,” असं संजय राऊत म्हणाले.

 

“राहुल गांधी यांची आणि माझी सातत्याने चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरेंचे काही निरोपही मी त्यांना दिले आहेत. महाविकास आघाडीबाबत तेदेखील समाधानी आहेत. सरकार एकत्रितपणे चालत असल्याचा त्यांना आनंद आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Protected Content