शेतातील रस्त्याच्या वादातून दोघांवर चौघांचा जीवघेणा हल्ला; पोलिसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शेतात जाण्याचा रस्त्याचा वाद न्यायप्रविष्ठ असतांना शेतातून ये-जा करू नका असे सांगणाऱ्या तरूणासह त्याच्या पुतण्याला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या चौघांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची घटना उमाळा परिसरात घडली.

शिवाजी भिका खडसे (वय-४०) रा. उमाळा ता.जि.जळगाव यांचे उमाळा शिवारात शेत आहे. शेताच्या लागून गावातील शिवाजी रामदास मनोरे याची शेती आहे. शिवाजी खडसे यांच्या शेतातून इतर शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने रस्त्याच्या वाद न्यायप्रविष्ट आहे. असे असतांना शिवाजी मनोरे यांना घरी जावून ‘शेतात ये-जा करण्यास मनाई असतांना शेतातून का जात आहे’ असा जाब विचारला. याचा शिवाजी मनोरे यांना राग आल्याने शिवाजी खडसे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण केल्याची माहिती शिवाजी खडसे यांनी भाऊ भागवत खडसे, पुतण्या संदिप भागवत खडसे, उमेश रामधन खडसे यांना सांगितले. चारही जण शिवाजी मनोरे याला समजविण्यासाठी गेले असता मनोरेचा मुलाग योगेश शिवाजी मनोरे याने घरात जावून विळा आणला आणि पुतण्या संदीप खडसे यांच्या डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. घटनास्थळी शिवाजी मनोरे यांचे नातेवाईक मुकेश देविदास मनोरे, देविदास रामदास मनोरे यांनीही मारहाण केली तर शिवाजी खडसे यांच्या उजव्या पायावर लोखंडी आसारीने वार करून जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिवाजी खडसे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी मनोरे, योगेश मनोरे, मुकेश मनोरे, देविदास मनोरे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content