राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक : मायावती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक आहे, सध्या देशात मजुरांची जी काही अवस्था झाली आहे त्याला काँग्रेसच जबाबदार आहे, अशी टीका बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सुखदेव विहार उड्डानपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या काही मजुरांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतानाचा एक व्हिडीओ आज पोस्ट केला आहे. यावरून मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक आहे. श्रमिकांचा पुळका आला आहे असे काँग्रेस नेते दाखवत आहेत. मात्र काँग्रेसने हे सांगायला हवं की लोकांची भेट घेतली तेव्हा त्यांना नेमकी किती आणि कशी मदत केली, असेही मायावती यांनी सुनावले आहे. आज कोरोना लॉकडाऊनमुळे देशातील स्थलांतरित मजुरांची जी अवस्था आहे, जी दुर्दशा झाली त्याला काँग्रेसच जबाबदार आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका मोठ्या कालावधीसाठी देशात काँग्रेसची सत्ता होती. एवढ्या मोठ्या शासनकाळात जर काँग्रेसने या मजुरांच्या अन्न, वस्त्र निवारा या गरजा सोडवल्या असत्या तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती’ असे देखील मायावती यांनी म्हटले आहे. तसेच ज्या मजुरांना आत्ता घरापर्यंत पोहचण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत त्यांना बसपाच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे असेही आवाहन मायावती यांनी केले आहे.

Protected Content