गिरणा धरणातून जिल्हावासियांना मिळणार तीन आवर्तने !

जळगाव, प्रतिनिधी |  यंदा पूर्ण भरलेल्या गिरणा धरणातून जिल्ह्यासाठी तीन आवर्तने सोडण्यात येणार असल्याचा निर्णय आज पाणी आरक्षण आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. नियमानुसार गिरणा धरणातून दोनच आवर्तने मिळणार असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकरी आणि लाभक्षेत्राच्या परिसरातील जनतेचे हित लक्षात घेता तिसरे अतिरिक्त आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

 

या अनुषंगाने गिरणा धरणातून अनुक्रमे १५ डिसेंबर, १५ जानेवारी आणि १ मार्च रोजी तीन आवर्तने सुटणार आहेत. तर पाटचार्‍यांच्या दुरूस्तीसाठी पाटबंधारे विकास खात्याने तयार केलेल्या १२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. यामुळे गिरणातील पाण्याचा शेवटच्या शेतकर्‍यालाही लाभ मिळणार आहे.

या संदर्भात वृत्त असे की, जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती आणि कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अधिक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण एस.डी. दळवी, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता वाय. के. भदाणे, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल, कालवा सल्लागार समिती सदस्य श्रीमती लताबाई धनगर व दत्तू जगन्नाथ ठाकूर; निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, महसूलचे नायब तहसीलदार अमित भोईटे, पाटबंधारे विभागाचे डी. बी. बेहेरे, मध्यम प्रकल्पाच्या अदिती कुलकर्णी, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, मजिप्रा अधिक्षक अभियंता एस. सी. निकम आणि पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एस.भोगवडे यांची उपस्थिती होती.

जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून यावर १३८ गावे अवलंबून आहेत.तर, बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गुळ या मध्यम प्रकल्पांवर १०१ गावे अवलंबून आहेत. तर ४० लघु प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो. अर्थात, तिन्ही प्रकारातील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली.

गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५२ वर्षात ते १२ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले आहे. यंदा देखील धरण पूर्ण भरल्याने यातील पाण्याचा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव, धरणगाव व अमळनेर तालुक्यातील २२२८१ हेक्टर जमीनीला सिंचनासाठी लाभ होणार आहे. याच तालुक्यांमधील १६० गावांना पिण्याच्या पाण्यासाठीही याचा लाभ होणार आहे. या अनुषंगाने गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्यात यावीत असे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. यातील शेती सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पहिले आवर्तन धरणातून १५ डिसेंबर रोजी सुटणार असून यातून ११०.२९ दशलक्ष घन मीटर इतके पाणी सोडण्यात येणार आहे. १५ जानेवारी २०२२ रोजी १०६.०४ दशलक्ष घन मीटर इतक्या पाण्याचे दुसरे आवर्तन सुटणार आहे. तर पालकमंत्र्यांनी खास शेतकर्‍यांना लाभ व्हावा म्हणून १ मार्च २०२२ रोजी १०६.०४ दशलक्ष घन मीटर इतक्या पाण्याचे आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक पाटचार्‍या नादुरूस्त झाल्या असून यामुळे आवर्तनाच्या पाण्याचा शेतकर्‍यांना पुरेपूर लाभ होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अधिक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण श्री. दळवी यांना त्यांच्या खात्याने पाटचार्‍यांच्या दुरूस्तीसाठी तयार केलेल्या १२ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश दिले. यामुळे गिरणा धरणातील पाणी हे शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पोहचणार आहे.

Protected Content