शेतकऱ्यांच्या शेतातील गोठ्यातून ७८ हजाराचा कापूस लांबविला

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाकोद ते तोंडापूर रस्त्यावर शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यातून ७८ हजार रुपये किमतीचा कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविंद्र भगवान भगत (वय-३१) रा. वाकोद ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे वाकोद ते तोंडापूर रस्त्यावर शेत आहे. या शेतात त्यांनी कापूस लावलेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी कापूसाची वेचणी करून शेतातील गोठ्यात १३ ते १५ क्विंटल वजनाचा कापूस ठेवलेला होता. दरम्यान २ फेब्रुवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोठ्याचा दरवाजा तोडून आत ठेवलेला ७८ हजार रुपये किमतीचा कापूस चोरून नेला. ही घटना घडल्यानंतर शेतकरी रवींद्र भगत यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुभाष पाटील करीत आहे.

Protected Content