शेअर बाजारात निर्देशांकात मोठी वाढ; सेन्सेक्ससह निफ्टी वधारले

मुंबई वृत्तसंस्था । जागात थैमान घालणाऱ्या करोना विषाणू रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना आणि अमेरिकन काँग्रेसने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. त्यानंतर जगभरातील भांडवली बाजारांमध्ये तेजी परतली आहे. आज सलग तिसऱ्या सत्रात स्थानिक शेअर निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांकडून चौफेर खरेदी केली जात असून सेन्सेक्सने झेप घेतली आहे.

करोना रोखण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. इतर देशांमधील मध्यवर्ती बँकांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक पॅकेजच्या घोषणा केल्या आहेत. भारतातसुद्धा केंद्र सरकारकडून लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर केले जाऊ शकते अशी चर्चा आहे. या सर्व घडामोडी शेअर बाजारासाठी पोषक ठरल्या असून गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ वाढवला आहे.

आज सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीने सुरुवात केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला आहे. तो सध्या २९ हजार ५४० अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २७७ अंकांच्या वाढीसह ८५९५ अंकांवर ट्रेड करत आहे. आजच्या सत्रात इंड्सइंड बँक, टेक महिंद्रा, ऍक्सिस बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, सन फार्मा, एचसीएल टेक, बजाज ऑटो, टायटन, हिरो मोटो कॉर्प, हे शेअर तेजीत आहेत. आयटीसी, कोटक बँक, भरती एअरटेल, मारुती, एसबीआय, टीसीएस या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

सलग तिसऱ्या सत्रात शेअर निर्देशांक वधारले असून मागील सत्रांतील घसरणीत झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात भरपाई केली आहे. मंगळवारी गुढी पाडव्याच्या दिवशी सेन्सेक्स १८६२ अंकांनी वधारला होता. निफ्टी ४९७ अंकांनी वधारला होता. या तेजीने गुंतवणूकदारांची मालमत्ता ५.५० लाख कोटींनी वाढली होती.

Protected Content