नागपूर-वृत्तसेवा । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार नागपुरात उघडकीस आला असून या प्रकरणी धानतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडिओ आणि धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार दिल्ली येथे ऑनलाइन आणि ऑफलाइन कमिशनवर कार्यरत असून एका संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. वैयक्तिक कामानिमित्त १८ एप्रिल २०२६ रोजी नागपुरात आले असताना २२ एप्रिल रोजी यशवंत स्टेडियम परिसरात त्याने सोशल मीडियावर ‘सनातनी शेर’ या आयडीवरून अपलोड केलेला व्हिडिओ पाहिला आणि त्यातून हा प्रकार समोर आला.

तक्रारीनुसार, संबंधित व्हिडिओमध्ये आयुष अग्रवाल नावाच्या व्यक्तीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी अपमानास्पद टिप्पणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलाबाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये ४८ तासांची ताकीद देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदाराने आणखी एका इंस्टाग्राम व्हिडिओचाही उल्लेख करत ४ एप्रिल रोजी संबंधित व्यक्तीच्या खात्यावरून प्रक्षोभक भाषा वापरून विविध समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या पोस्टमुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात संबंधित आरोपी आयुष रमेशचंद्र अग्रवाल (वय ४४) हा नागपूरच्या मानेवाडा चौक परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणे, भीतीचे वातावरण निर्माण करणे आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. संबंधित सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी करण्यात येत असून आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्रीय मंत्र्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिले जात असून सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर आणि प्रक्षोभक मजकुरामुळे निर्माण होणारे धोके पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.



