शेंदुर्णी रथोत्सव होणार केवळ ५ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील २७५ वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव व यात्रोत्सव कार्तिक शुध्द चतुर्दशी रविवार २९ नोव्हेंबर रोजी होणार होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार केवळ पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत रथाची पूजन करण्यात येणार आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार धार्मिक व पारंपारिक भावना जपण्यासाठी केवळ पाच पुजाऱ्यांना रथ असलेल्या जागीच रथाचे पूजन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अहवाल तहसीलदार जामनेर, पोलिस निरीक्षक पहुर, मुख्याधिकारी शेंदूर्णी या अधिकाऱ्यांच्या त्रिसदस्यीय समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याचे जामनेरचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी अरुण शेवाळे यांनी सांगितले आहे. यंदा शेंदूर्णी नगरीत रथोत्सव व यात्रोत्सव साजरा करण्यात येणार नसल्याने नागरिकांंनी रथोत्सव व यात्रोत्सव निमित्ताने शेंदूर्णी येऊ नये असे आवाहन पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे. कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील यंदाचा रथोत्सव व यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी नगरपंचायतमध्ये आयोजित बैठकीत जाहीर केले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पंडित दीनदयाळ पतसंस्था चेअरमन अमृत खलसे, नगरसेवक निलेश थोरात, शरद बारी, सतीश बारी ,श्रीकृष्ण चौधरी, तालुका उपाध्यक्ष सुनील शिनकर, धीरज जैन, पंडीत जोहरे, संत कडोबा संस्थानचे गादी वारस हभप शांताराम भगत, तुषार भगत, त्रिविक्रम मंदिर पुजारी तुषार भोपे , हभप कडोबा माळी, टी. के. पाटील, सर्व पत्रकार व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content