शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सीसीआयच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार्या कापसाच्या प्रक्रियेत गोंधळ मिटत नाही तोच या प्रक्रियेत शेतकर्यांची लूट होत असल्याचे समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याबाबत वृत्त असे की, शेंदूर्णी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे व यासाठी विक्रेत्या शेतकर्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात यावी या मागणीसाठी परिसरातील शेतकर्यांनी गेल्या १० दिवसांपूर्वी उपबाजार समितीच्या गेट समोर एकच गर्दी केली होती. परंतु गेटला कुलूप असल्याने शेतकर्यांनी संताप व्यक्त केला त्यानंतर बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील यांच्या आदेशाने टोकन साठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीचे फार्म ज्ञानेश्वर मापारी यांनी स्वीकारले तेव्हा शेतकर्यांचा जीव भांड्यात पडला होत. यामुळे आपली कापूस विक्रीची चिंता मिटली असा समज शेतकर्यांना झाला होता. परंतु त्यांचा हा समज जामनेर बाजार समितीचे धोरणाने तेव्हा गैरसमज ठरला. या कापूस खरेदी केंद्रावर शेंदूर्णी व परिसरातील शेतकर्यांचा कापूस खरेदी व मोजणी करण्याऐवजी जामनेर तालुक्यातील अन्य गावाचा कापूस शेंदूर्णी सीसीआय केंद्रावर मोजण्यासाठी जामनेर बाजार समिती कडून टोकन दिले जात असल्याचे निदर्शनास आले. शेंदूर्णी येथिल शेतकर्यांना कापूस विक्रीसाठी जामनेर सीसीआय केंद्रावर जाण्यासाठी टोकन देण्यात आले. त्यामुळे शेंदूर्णी येथील शेतकर्यांचा संताप झाला. त्यांनी या विषयावर बाजार समितीचे सभापती व सचिवांकडे तक्रारी करून जाब विचारले असता बाजार समितीचे सभापती संजय देशमुख यांनी उपबाजार आवार शेंदूर्णी येथे राष्ट्रवादीचे नेते संजय दादा गरुड, भाजपचे अमृत खलसे, गोविंद अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते प्रविण गरुड, जिनिंग प्रेसिंग संचालक राजेंद्र पवार यांच्यासह शेतकर्यांची बैठक घेतली त्यात शेंदूर्णी परिसरातील शेतकर्यांना जामनेर व जामनेर परिसरातील शेतकर्यांना शेंदूर्णी येथे कापूस विक्रीसाठी पाठविल्याने शेतकर्यांना ३,४ हजारांचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच आधीच संकटात सापडलेल्या शेतकर्यांची पिळवणूक केली जात आहे अशी व्यथा शेतकर्यांनी मांडली.
त्यावर साधक बाधक चर्चा होऊन तोडगा काढतांना शेंदूर्णी परिसरातील शेतकर्यांचा कापूस शेंदूर्णी केंद्रावर मोजण्यासाठी प्राधान्य देण्याचे ठरले. त्यानंतर सीसीआय कापूस खरेदी धोरणानुसार कापूस मोजतांना शेतकर्यांच्या कापसाच्या दर्जानुसार प्रति क्विंटल २ ते ३ किलो घट लावणे अपेक्षित असतांना स्थानिक केंद्र प्रमुख प्रदीप पाटील हे सरसकट ७ ते ९ किलो पर्यंत प्रति क्विंटल घट लावत असल्याने शेतकर्यांची प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये केंद्र सरकारच्या अधिकृत कापूस खरेदी केंद्रावर लूट केली जात असल्याने व ग्रेडिंग करतांना ग्रेडर मनमानी करीत असल्याचा आरोप शेतकर्यांकडून करण्यात आले. त्यावेळी केंद्र प्रमुख ग्रेडर प्रदीप पाटील हे शेतकर्यांच्या शंकाचे निरसन करू शकले नाहीत. तसेच कापूस खरेदी करतांना कापसाच्या दर्जानुसार किती घट लावता येते याचे स्पष्टीकरण देऊ न शकल्यामुळे शेतकर्यांचा संताप अनावर झाला होता. तेव्हा बाजार समिती सभापती संजय पाटील,संजय दादा गरुड, अमृत खलसे यांनी शेतकर्यांची समजून घातली व नियमानुसार घट लावून सर्व शेतकर्यांना न्याय द्यावा असे ठरले आहे. आता तरी शेतकर्यांना न्याय मिळणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.