शिवाजी नगर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करा

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजी नगर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी भाजप नगरसेविका गायत्री शिंदे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवाजी नगर परिसर हा संमिश्र वस्तीचा भाग आहे. लोक संख्येच्या दृष्टीने या परिसरात झपाट्याने वाढ होत आहे. यासोबत गुन्हेगारी, अवैध धंदे यात देखील वाढ होत आहे. या परिसरात शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक पोलीस चौकी असून तेथे दोन कर्मचारी नियुक्त असतात. त्यामुळे वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढत चाललेती गुन्हेगारी यास आळा पालण्यासाठी फक्त दोन पोलीस कर्मचारी अपुरे पडत आहेत. एखादी घटना घडल्यास शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना शहर पोलीस स्टेशन येथे येऊन आपली तक्रार द्यावी लागते. त्यामुळे बऱ्याच वेळा घटनेच्या ठिकाणी पोलीस कुमक पोहचण्याआधीच गुन्हेगार पसार होतात. या सर्व परिस्थितीमुळे शिवाजी नगर परिसरातील स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

शिवाजी नगर परिसर हा रेल्वे लाईन तसेच रेल्वे स्टेशनला लागून असून या परिसरात महावीर नगर, भारत नगर, दूध फेडरेशन, इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर, खडके चाळ, गेंदालाल मिल घरकुल, हुडको घरकुल, दालफळ, उस्मानिया पार्क यासह अनेक छोटे-मोठे रहिवासी परिसर जोडले गेले आहेत.

सामाजिक व राजकीय दृष्टीने हा परिसर अती सवेंदनशील असून, परिसरात हिंदू, मुस्लीम, बोहरी, ख्रिश्चन अश्या अनेक समाजाचे व धर्माचे धार्मिक स्थळे व स्मशानभूमी, दफनभूमी असून, दर एक दोन दिवसात या परिसरात भांडणतंटे, चोरी, हाणामारी, पूर्ववैमस्यातून होणारे हल्ले अश्या प्रकारच्या घटना या घडत असतात. त्यामुळे दर महिन्याला शहर पोलीस स्टेशनला दाखल होणाऱ्या एकूण गुन्हयात जास्तीत जास्त गुन्हे शिवाजी नगर हद्दीतील असतात. याला आळा घालण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षितेसाठी शिवाजी नगर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात अशी मागणी नगरसेविका गायत्री शिंदे यांनी केली आहे. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शेहबाज शेख, वसंत पा.पोळ ,विलास खडके , उत्तम शिंदे, संजय सणस, धर्मेंद्र टेमकर आदी उपस्थित होते.

Protected Content