शिपायांच्या १३ पदासाठी २७ हजार ६७१ अर्ज !

 

चंदीगड : वृत्तसंस्था । हरयाणामधील पानीपतमधील न्यायालयामध्ये १३ शिपायांच्या पदासाठी आयोजित भरतीसाठी तब्बल २७ हजार ६७१ तरुणांनी हजेरी लावली.

 

या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती आठवी उत्तीर्ण असणारी हवी अशी अट आहे. मात्र या पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांनाही अर्ज करुन भरतीसाठी हजेरी लावली होती. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने आम्ही या पदासाठी अर्ज केल्याचं येथे उपस्थित असणाऱ्या अनेक तरुणांनी सांगितलं. ही नोकरी मिळाली तर कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल अशी अपेक्षा अर्ज करणाऱ्या उच्चशिक्षित उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

 

हरयाणामध्ये बेरोजगारी एवढी वाढली आहे की डी ग्रुपमधील भरतीसाठी उच्चशिक्षित तरुणही अर्ज करताना दिसत आहेत. त्यामुळेच १३ पदांसाठी २७ हजार ६७१ जणांनी अर्ज केलाय. पानीपत न्यायालयामधील शिपायाच्या पदवीसाठी एमए, बीटेक, बीएससी आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनाही अर्ज केलाय. शिक्षण घेतल्यानंतरही चांगली नोकरीची संधी न मिळाल्याने अनेकांनी शिपाई तर शिपाई म्हणत रोजगार मिळेल या अपेक्षेने अर्ज केला आहे.

 

अर्ज करण्यात आलेल्या २७ हजार ६७१ पैकी तीन हजार अर्जदारांना तपासणीसाठी आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलवण्यात आलं होतं. अर्ज विचाराधीन घेण्याआधी सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते. कागदपत्र उपलब्ध नसतील तर अर्ज रद्द केला जातो. २३ फेब्रुवारीपर्यंत अर्जांच्या छाणणीचं काम केलं जाणार आहे. मात्र या नोकरीसाठी शुक्रवारी पानीपत कोर्टासमोरील मैदानामध्ये जमलेल्या हजारो तरुणांची संख्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. ही संख्या बेरोजगारीचे भीषण वास्तव दर्शवणारी आहे असं मत येथील अनेकांनी व्यक्त केलं. मात्र पोटापाण्यासाठी मिळेल ती नोकरी करण्याशिवाय पर्याय नसल्याने हजारो अर्ज असले तरी आम्ही अर्ज केलाय असं अनेकांनी सांगितलं. आता या २७ हजारांहून अधिक अर्जांची चाचपणी करुन त्यामधील अपात्र अर्ज रद्द केले जातील. त्यानंतर उरलेल्या अर्जांमधून १३ जणांची निवड होणार आहे.

Protected Content