शिक्षकाचे बंद घर फोडून ३० हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील शिंदे नगरातील शिक्षकाचे बंद घर फोडून घरातील ३० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील शिंदे नगरात शिवराम जयराम शिरसाठ हे वास्तव्यास असून ते धरणगाव तालुक्यातील धार येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा पुणे येथे राहत असल्याने २७ डिसेंबर रोजी शिवराम शिरसाठ हे पत्नीसह मुलाकडे गेले होते. रविवारी १ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास शिरसाठ यांच्या शेजारी राहणारे प्रवीण कोलते यांनी त्यांना फोन करुन तुमच्या घराचे कुलूप तुटलेले आहे तर गेटला लॉक असून तुमच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर शिरसाठ हे लागलीच जळगाव येण्यासाठी पुणे येथून निघाले. सोमवारी २ जानेवारी रेाजी सकाळी ७.३० वाजता शिवराम शिरसाठ हे घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी त्यांच्या घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. तर बेडरुमधील लाकडी कपाटात ठेवलेली ३० हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचे त्यांना समजले. त्यांनी लागलीच रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content