शहरातील अवैध धंदे बंद करा अन्यथा जनआंदोलन छेडू : अमोल कोल्हे

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहरातील वाढते अवैध धंदे बंद करण्यात यावे यामागणीसाठी राष्ट्रीय दलित पँथरचे जळगाव महानगर अध्यक्ष शांताराम बुधा अहिरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आरंभले आहे. मात्र, ६ दिवस उलटून ही जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे याची दखल घेण्यात आलेली नसल्याने छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी निवेदन ईमेलद्वारे जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक यांना अवैध धंद्यांवर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.

 

ईमेलचा आशय असा की, जळगाव जिल्ह्यात विशेषतः जळगाव शहरात अनेक ठिकाणी सट्टा , जुगार अड्डे मोबाईलद्वारे सट्टा तत्सम अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. हे धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी राष्ट्रीय दलित पँथरचे जळगाव महानगर अध्यक्ष शांताराम बुधा अहिरे १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन अवैध धंदे ७ दिवसात बंद न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तरी देखील अवैध धंद्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे शांताराम अहिरे यांनी २० ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणास ५ दिवस उलटूनही जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील कोणीही जबाबदार अधिकारी श्री. अहिरे यांना अवैध धंदे बंद करण्याबाबत लेखी व तोंडी आश्वासन तर दिले नाही. शिवाय याविषयी चर्चा करण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही. यावरूनच अवैध धंदे चालक व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक साटेलोटे असल्याचे दिसत असल्याचा आरोप श्री. अमोल कोल्हे यांनी केला आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास छावा मराठा युवा महासंघ व अनेक सामाजिक संघटना यांच्यातर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे देण्यात आला आहे.

Protected Content