शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना-पडळकरांच्या वक्तव्याने वाद

मुंबई प्रतिनिधी । शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना असून त्यांनी सातत्याने धनगर आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेतली असल्याची टीका भाजपचे नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी केल्याने यावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याचे संकेत मिळाले आहेत.

आ. गोपीचंद पडळकर यांनी आज शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचे माझे मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे. पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. पण सरकार गेल्यानं त्यांना कारवाई करता आली नाही. मात्र या सरकारने एक रुपयाही दिला नाही. सरकार वेगवेगळ्या समाजासंबधी वेगवेगळी भूमिक घेत आहे. धनगर समाजाचं प्रकरण न्यायालयात असतानाही वकील दिला नाही. राज्यात दोन क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाची ही परिस्थिती असेल तर इतर छोट्या घटकांची काय परिस्थिती असेल हे सांगायची गरज नाही. लोकांना आता शरद पवारांची भूमिका कळू लागली आहे. दरम्यान, कोरोना संकट संपल्यानंतर शरद पवारांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

Protected Content