मयत सफाई कर्मचार्‍याच्या वारसांना ५० लाखांची विम्याची रक्कम मिळावी

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा प्रतिकार करतांना या विषाणूची लागण होऊन मयत झालेले सफाई कर्मचारी दिवंगत प्रकाश करणसिंग तुरखुले यांच्या वारसांना शासन निर्णयाप्रमाणे ५० लाख रूपयांच्या विम्याची रक्कम करावी अशी मागणी अखील भारतीय सफाई कामगार संघटनेने एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

भुसावळ नगरपालिकेच्या आस्थापनेमध्ये कार्यरत असणारे प्रकाश करणसिंग तुरखुले यांना कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी कार्यरत असतांना या विषाणूची बाधा झाली होती. यात उपचार सुरू असतांना १२ जून रोजी त्यांचे जळगाव येथे निधन झाले. तत्पूर्वी राज्य सरकारने २९ मे रोजी शासन निर्णय जाहीर करून कोरोनाच्या प्रतिकार करण्यासाठी कार्यरत असणार्‍या सफाई कर्मचार्‍यांसाठी ५० लाख रूपयांचे विमा कवच मिळणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे या शासन निर्णयानुसार प्रकाश तुरखुले यांच्या वारसांना अद्याप देखील या विम्याची मदत मिळालेली नाही. यामुळे प्रशासनाने तातडीने त्यांच्या वारसांना विम्याची रक्कम प्रदान करावी अशी मागणी अखील भारतीय सफाई कामगार संघटनेने या निवेदनात करण्यात आली असून हे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले आहे.

Protected Content