जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून सामनेर ता.पाचोरा येथील विवाहितेला तिची सासू व दोन नंदांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून खून केल्याप्रकरणात पतीसह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता जळगाव सेशन्स कोर्टाने केली आहे.
याबाबत माहिती अशी की, सामनेर, ता.पाचोरा येथील अनिता आबाजी पाटील हीला २६ ऑगस्ट २०१३ रोजी रात्री ९:३०वाजता जळगाव येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये १०० टक्के जळालेल्या अवस्थेत दाखल केले होते. त्याच दिवशी रात्री ११ वाजेचे सुमारास अनिता हिचा मृत्युपूर्व जबाब जळगाव एमआयडीसी पोलीसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमाकांत पाटील यांचे उपस्थितीत यांनी नोंदला. त्यात अनिताबाईने आरोप केला की, २६ ऑगस्ट २०१३ रोजी सायंकाळी ४ वाजचे सुमारास ती शेतातून मुगाच्या शेंगा तोडुन घरी आली. त्यावेळी सासु सुशिलाबाई सुदाम पाटील हीने तिच्याशी कुरापत काढून भांडण करु लागली. तिचा जेठ प्रताप सुदाम पाटील रा. शिरसोली, ता जि. जळगांव, दोन्ही नणंदा रेखा आबा पाटील रा. तारखेडा, ता पाचोरा व सुरेखा सुभाष पाटील रा. लोहारी, ता. पाचोरा हे तिघेही घरात होते. दोन्ही नणंदा रेखा, सुरेखा व सासु सशिलाबाई यांनी तिला धरुन शिविगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी अनिताने आरडाओरडा सुरू केल्याने जेठ प्रताप याने तिला धरुन ठेवले आणि दोन्ही नणंदा व सासु या तिघींनी घरातील प्लॅस्टिकच्या कॅनमधील रॉकेल तिच्या अंगावर टाकुन तिला पेटवून दिले व त्यानंतर चौघेही घरातुन पळुन गेले. जळाल्याच्या वेदनांमुळे ती आरडाओरडा करायला लागल्यामुळे तिचा पती व गल्लीतील आजुबाजुचे लोक धावत आले. त्यांनी तिला जळगाव येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, असा जबाब फिर्यादी अनिता आबाजी पाटील हिने दिल्यावरुन त्या जबाबाच्या आधारे पाचोरा पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे सर्व पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला व त्यांना अटक झाली. त्यानंतर फिर्यादी अनिताच्या आई-वडिलांच्या व दोन भावांनी अनिताचा पती आबाजी याचेविरुद्ध संशय व्यक्त केल्याने त्यालाही अटक करण्यात आली. त्यानंतर १ सप्टेंबर २०१३ रोजी जळीत अनिताबाईचा मृत्यू झाल्यामुळे सदर गुन्ह्यात भादंवि कलम ३०२ समाविष्ट करण्यात आले.
एकुण अठरा साक्षीदार तपासले
सदर खटल्याचे चौकशीकामी जळगाव सेशन्स कोर्टात सरकारपक्षातर्फे मयत अनिताबाईचा मृत्यपुर्व जबाब नोंदविणारे पोकॉ सोपान ठाकुर, तसेच मयत अनिताबाईचे आई-वडिल निर्मलाबाई भिवराज पाटील व भिवराज रामभाऊ पाटील, मयत अनिताचे भाउ प्रविण भिवराज पाटील व शरद भिवराज पाटील सर्व रा.महिंदळे, ता. भडगाव, जि. जळगाव, तसेच मयत अनिताला विझवणारे सामनेर येथील शेजारी पिंटू वाल्मिक पाटील, प्रभाकर रामचंद्र पाटील, सुनील वामन पाटील, पंच वैद्यकीय अधिकारी डॉ. रमाकांत पाटील, डॉ. उमेश वानखेडे, डॉ. नरेश नारखेडे, तपासी अंमलदार पोलिस निरीक्षक बाळासाहेब गायधनी यांचेसह ईतर असे एकुण अठरा साक्षीदार तपासण्यात आले.
साक्षीदारांच्या जबानीतील तफावती अविश्वासार्हता तसेच तपासकामातील तृटी आदी बाबींचा विचार होउन जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्याचे चौकशीकामी अॅड. वसंत आर ढाके यांनी आरोपींतर्फे बचावाचे काम पाहिले. त्यांना अॅड. प्रसाद व्ही ढाके, अॅड. भारती व्ही ढाके, अॅड. उदय एस खैरनार व अॅड. शाम बी जाधव यांनी सहकार्य केले.