कोरोनाबाबतची नकारात्मक भावना काढून टाका ; कोरोनामुक्त रुग्णाच्या भावना

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला म्हणजे सगळे संपले ही नकारात्मक भावना मनातून काढून टाकावी अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त रुग्णांनी व्यक्त केल्या आहेत.

भडगाव येथील ४० वर्षीय व्यक्तीला १८ मेला कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांनी भडगाव येथील क्वारंटाईन सेंटर श्रीराम मंगल कार्यालय येथे जावून स्वत:हून तपासणी करून घेतली. त्यांचा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येताच त्यांना जळगावच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी आपणहून कोरोना तपासणी करवून घेतली असल्याने कोरोनाची भिती त्यांनी मनातून आधीच काढून टाकली होती. शिवाय रूग्णालयातील डॉक्टर, पारिचारिका यांनी दिलेला विश्वास आणि वैद्यकीय इलाजासाठी आवश्यक असलेली तत्परता लाभल्याने आपण लवकर बरे होऊन घरी परत जाऊ हा आपल्याला विश्वास वाटू लागला असल्याचे ते सांगतात. हा विश्वास सार्थ ठरत २७ मे रोजी पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. घरच्यांच्या चेहऱ्यांवर दिसणारा आनंद हा मला या मिळालेल्या उपचाराने मिळवून दिला होता,असेही त्यांनी सांगितले. कोरोना झाला तरी तो बरा होऊ शकतो त्याचा उगाच बाऊ करण्याचे कारण नाही. आपल्याला शासकीय आरोग्य विभागाकडून उत्तम सेवा मिळत असते यावर विश्वास ठेवा असा सल्ला ते आता कोरोनाग्रस्तांना देतात.

भोकर, ता.जळगाव येथील वय ६० व ३७ वर्षांच्या या काकू-पुतण्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सतर्कता कशी असावी हे स्पष्ट करतांना सांगितले की, काकांचे वरवर पाहता हृदयविकाराने निधन झाले असे वाटत असतांना सुध्दा त्यांचा मृत्यूपश्चात कोरोना विषयी स्वॅब घेवून तपासणीला पाठविण्याचा कुटुंबाने निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे त्यांचा स्वॅब घेण्यात येवून त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी मग आपणहून कोरोना टेस्ट करून घेण्याचा निर्णय घेतला. तपासणी अहवालात काकू आणि पुतणे हे दोघे पॉझिटिव्ह असल्याचा वैद्यकीय अहवाल आला . मात्र कुटुंबातील इतर सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झालेत. रूग्णालयात दाखल झालो आणि बरे ही झालो. घरात कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याचे दु:ख बाजूला ठेवून हयात असलेल्या कुटुंबांच्या आरोग्याची काळजी घेत भोकर येथील या कुटुंबियांनी दाखविलेली तत्परता समाजापुढे आदर्शवत आहे. शिवाय त्यांनी उपचारादरम्यान आरोग्य प्रशासनाकडून चांगल्या आरोग्य सेवेसोबतच उत्तमप्रकारे औषधोपचार मिळाल्याचाही आवर्जून उल्लेख केला. कोणालाही कोरानाची लक्षणे आढळल्यास त्यांनी वेळ न दवडता तात्काळ तपासणी करून इलाज केल्यास कोरोना तुमच्या कुटुंबापासूनच नाही तर तुमच्या गावच्या वेशीपासूनही लांब निघून जाईल, असा सल्ला या दोघांनी समाजाला दिला आहे.

भुसावळच्या ६८ वर्षीय आणि ३७ वर्षीय पितापुत्र यांनी देखील अशीच तत्परता दाखविल्याचे दिसून येते. या व्यक्तीच्या जळगाव येथे पोलीस दलात कार्यरत असलेलल्या मावसभावाची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर भुसावळ येथे आपल्या घरी मुक्कामी ठेवून इलाज करून घेतला होता. प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत नाही म्हणून त्यांना जळगाव येथे पुढील इलाजासाठी हलविण्यात येउुन त्यांची जळगाव येथे तपासणी केली असता मावसभावाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यात त्यांचे दु:खद निधनही झाले . हे कमी की काय या पित्याच्या पत्नीचा किडनीच्या आजाराने याच दरम्यान मृत्यू झाला आणि तिचा मृत्युपश्चात कोरोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला. पत्नी आणि मावसभाऊ यांचे दु:ख कवटाळत न बसता आपण स्वत:हून कोरोनाची टेस्ट करवून घ्यावी असा या परिवाराने निर्णय घेतला आणि ३१ मे रोजी घेतलेल्या स्वॅबनुसार त्यात या पितापुत्राचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर काहीशी भिती त्यांना सुरवातीला वाटली. परंतु, दवाखान्यात मिळालेल्या वैद्यकीय सेवेमुळे आणि चांगल्या औषधोपचार व आवश्यक सकस आहारामुळे आपण लवकर बरे होवून कुटुंबात सुखरूप परतलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील मुलांचे वसतिगृहातील २३ वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचे मनोगत असेच आशादायी.. आपल्या मनोगतात हा विद्यार्थी सांगतो की, मला कोरोनाच्या लक्षणांची किंचितशी चाहुल लागताच शंकेचे निरसन करून घ्यावे म्हणून मी स्वत: दवाखान्यात जावून कोरोना टेस्ट करून घेतली. अगदी काहीशी लक्षणे दिसत असतांनाच माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली. मी न घाबरता, वेळ वाया न घालवता वेळेत निदान झाल्याचे समाधान मानून पुढील इलाजाला सामोरे गेलो. रूग्णालयात माझ्यावर अगदी मायेने आणि कुटुंबवत्सल भावनेतून इलजा केला गेला. मी २० मे रोजी पुर्णपणे बरा होवून माझ्या वसतिगृहात परतलो असून आता पुर्ववत अभ्यासालासुध्दा लागलो आहे. कोरोना झाला म्हणजे आता सारे काही संपले. ही नकारात्मक भावना नागरिकांनी मनातून काढून टाकून देऊन कोरोनाची लक्षणे दिसताच टेस्ट करून घेतल्यास आणि टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास सर्व शासकीय आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून इलाज करवून घेतल्यास आपण आपल्या कुटुंबात लवकरात लवकर अगदी ठणठणीत बरे होवून परत जाल. असा मी आपल्याला माझ्या अनुभवावरून विश्वास देतो, असे ठामपणे हा विद्यार्थी सांगतो

Protected Content