विधेयकातील त्रुटी सुधारून शेतकर्‍यांना संपुर्ण स्वातंत्र्य द्या

 

 

नगरः वृत्तसंस्था । ‘केंद्र सरकारने संमत केलेल्या विधेयकांच्या समर्थनार्थ तसेच विधेयकातील त्रुटी सुधारून शेतकर्‍यांना संपुर्ण स्वातंत्र्य देण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना २ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी समर्थन व संपुर्ण स्वातंत्र्य आंदोलन करणार आहे,’ अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

संसदेत विरोधकांचा विरोध डावलून केंद्र सरकारने कृषी विधेयक सहमत केल्यानंतर या विधेयकाविरोधात विविध शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’आंदोलन २५ सप्टेंबरला केले होते. मात्र, या विधेयकाला शेतकरी संघटनेने समर्थन दिल्याने आता या संघटनेच्या २ ऑक्टोबरच्या विधेयक समर्थन आंदोलनात किती शेतकरी सहभागी होतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शेतकरी संघटनेच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार शेतकर्‍यांसाठी बाजारपेठ खुली होत आहे, हे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे. शेतकर्‍यांना शेतीमाल व्यापाराचे स्वातंत्र्य सरकार देत आहे. मात्र आवश्यक वस्तू, कायद्यातून वगळलेल्या वस्तू, भाव वाढ झाल्यास, पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या विधेयकातील तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध आहे. या तरतुदीमुळे शेतीमाल व्यापारावर अनिश्चिततेची टांगती तलवार राहणार आहे.

या तरतुदीमुळे शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार व गुंतवणुकदार सर्वांचाच तोटा आहे. कायदा तयार करताना सरकारने ही दुरुस्ती करावी, अशी शेतकरी संघटनेने मागणी केली आहे. सरकार योग्य दिशेने वाटचाल करीत आहे, याचे समर्थन करतानाच शेतकर्‍यांना अर्धवट नको, संपुर्ण स्वातंत्र्य पाहिजे, यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहे.

सरकारचे लक्ष या मागणीकडे वेधण्यासाठी व विधेयकांविषयी चिंतन करण्यासाठी २ आॉक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीच्या दिवशी शेतकरी महात्मा गांधी किंवा लाल बहादुर शास्त्री यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत चिंतन प्रबोधन करतील, व त्यानंतर मोर्चाने जाऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतील, अशी माहितीही घनवट यांनी दिली.

Protected Content