विद्यापीठात इनक्युबेशन सेंटरसाठी २५ लाखाचा निधी प्राप्त

जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पना विकसित करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरसाठी महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेल्या पाच कोटी रुपयांच्या निधीपैकी पंचवीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून स्टार्टअप अंतर्गत नाविन्यपूर्ण उद्योजकांना चालना मिळावी यासाठी विद्यापीठात इक्युबेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने या केंद्रासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यातील पंचवीस लाख रुपयांचा निधी विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेच्या नविन विस्तारित इमारतीमध्ये दहाहजार स्क्वेअर फुट जागेवर हे केंद्र सुरु होणार आहे. विद्यापीठाने स्थापन केलेल्या सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन ॲण्ड लिंकेजेसच्या वतीने नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी मदत केली जाणार आहे. अनेकदा उद्योग सुरु करतांना क्षमता असूनही उद्योग हवा तसा यशस्वी होत नाही. त्यामुळे उद्योग सुरु करतांना त्यातील बारकावे आधीच माहिती झाले तर उद्योग यशस्वी होण्याचे प्रमाण वाढीला लागेल. या इनक्युबेशन सेंटरच्या वतीने उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व उद्योगाची संकल्पना रुजण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. भारत सरकारच्या स्टार्टअप व आत्मनिर्भर भारत अभियानाला पूरक असे या केंद्राचे काम राहील. खान्देशातील नवउद्योजक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा अधिक फायदा होईल. या केंद्राला प्राप्त झालेल्या निधीबददल कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर व प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी समाधान व्यक्त केले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या इनक्युबेशन सेंटरला अधिक गती दिली जाणार असल्याची माहिती केंद्राचे संचालक प्रा. भूषण चौधरी व प्रा.व्ही.व्ही.गिते यांनी दिली.

Protected Content